पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या ८ पदरी उन्नत महामार्गाचे उद्घाटन केले. गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंत बांधलेल्या या द्वारका एक्सप्रेसवेसोबतच, अर्बन एक्सटेंशन रोड-२ (यूईआर-२) चेही उद्घाटन करण्यात आले. नोएडातून विमानतळ हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे. यावेळी मोदींनी दिवाळीला डबल बोनस मिळणार असल्याची घोषणा केली.
आपल्याला दिल्लीला विकासाचे असे मॉडेल बनवायचे आहे, जिथून सर्वांना वाटेल की ती विकसनशील भारताची राजधानी आहे. दिल्लीच्या मागील सरकारांनी दिल्लीला उद्ध्वस्त केले. नवीन भाजप सरकारला दिल्ली पुन्हा उभारण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. यूपीए सरकारच्या काळात फायली हलायच्या, आम्ही त्यावर काम सुरु केले. राज्यांमध्ये भाजप सरकारे स्थापन झाली तेव्हा विकास सुरू झाला, असे मोदी यांनी सांगितले.
जीएसटीमध्ये पुढील टप्प्यातील सुधारणा होणार आहेत. दिवाळीत दुप्पट बोनस दिला जाणार आहे. आम्ही त्याचे संपूर्ण स्वरूप राज्यांना पाठवले आहे. मला आशा आहे की सर्व राज्ये सरकारला सहकार्य करतील. ही दिवाळी अधिक भव्य व्हावी म्हणून आम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करू, असे मोदी म्हणाले.
तुम्ही भारतीय असाल तर तुम्ही फक्त भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. दिवाळीला फक्त भारतीयांनी भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी कराव्यात. व्यापाऱ्यांनीही परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक वस्तू विकाव्यात असा सल्ला मोदी यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही परदेशातून खेळणी आयात करायचो. आम्ही स्थानिक पातळीवर खेळणी बनविण्याचा संकल्प केला आणि आज आम्ही १०० हून अधिक देशांमध्ये खेळणी पाठवतो, असे मोदी म्हणाले.