नवी दिल्ली : प्रत्येक नदीचा स्वत:चा स्वभाव असतो. नद्यांचे प्रवाह अडवणारी बांधकामे, नद्या दूषित करणारे कारखाने व अतिक्रमणे जो हटवली जात नाहीत, तिथे कॉन्झर्वेशन झोन तयार केला जात नाही, तोपर्यंत केरळच्या महापुरासारख्या आपत्ती वारंवार येतच रहातील... हे उद्गार आहेत राजस्थानात ‘जल क्रांती’ चा यशस्वी प्रयोग राबवणारे जलमित्र राजेंद्रसिंह यांचे.देशात मृत नद्यांना पुनरूज्जीवित करणारा प्रयोग यशस्वीरित्या राबवल्याबद्दल राजेंद्रसिंगांना रॅमन मॅगेसेसे पुरस्काराने व स्टॉकहोमच्या पाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजेंद्रसिंग म्हणाले की, केरळातला महापूर म्हणजे राज्यातल्या ४४ नद्यांचे कोंडलेले अश्रू आहेत. केरळ सरकारने २0१५ साली मला मृतप्राय नद्यांसाठी खास योजना बनवण्यासाठी निमंत्रित केले होते. केरळचे मंत्री व अधिकारी यांच्यासह बैठक झाली. नद्यांचे पुनरूज्जीवन, पूरस्थितीला रोखणे व अन्य मुद्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नद्यांना वाचवण्यासाठी खास विधेयक तयार करण्याचे ठरले. त्यासाठी केरळ सरकारने माझे मत मागवले. त्यावेळी नद्यांच्या जलमार्गातले अडथळे, अतिक्रमणे व प्रदूषण दूर करण्याचा आग्रह मी धरला व त्याची सविस्तर यादीही केरळ सरकारकडे सोपवली. आज केरळातील महापूर पहाताना या साऱ्या सूचनांचा तिथल्या सरकारला विसर पडला असावा असे वाटते. नदीच्या मार्गातील अतिक्रमणे वेळीच हटवली नाही तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव तेव्हाच मी केरळ सरकारला करून दिली होती.
'केरळमधील महापूर म्हणजे ४४ नद्यांचे कोंडलेले अश्रू'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:55 IST