एकाच वेळी दोन पदव्यांवर अभ्यास करू देण्यावर विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:35 AM2019-07-22T01:35:42+5:302019-07-22T01:35:50+5:30

विद्यापीठ अनुदान आयोग, दुसऱ्यांदा नेमली समिती

Think about letting you study two titles simultaneously | एकाच वेळी दोन पदव्यांवर अभ्यास करू देण्यावर विचार

एकाच वेळी दोन पदव्यांवर अभ्यास करू देण्यावर विचार

Next

नवी दिल्ली : एकाच किंवा दोन वेगवेगळ्या विद्यापीठांतून एकाच वेळी दोन पदव्यांचा अर्धवेळ, बहि:शाल पद्धतीने किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास करता येईल का, याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक समिती नेमली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन या समितीचे प्रमुख आहेत.

या विषयाबद्दल अशा प्रकारची समिती काही पहिल्यांदाच नेमण्यात आलेली नाही. २०१२ सालीही विद्यापीठ अनुदान आयोगाने हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू फरकान कमर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर चर्चाही झाली होती. मात्र, त्यातून पुढे काहीही निष्पन्न झाले नाही. एका पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला त्याचवेळी त्याच किंवा दुसºया विद्यापीठाच्या अन्य पदवी अभ्यासक्रमासाठीही बहि:शाल किंवा इतर पद्धतीने प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस कमर समितीने केली होती.

या समितीने आपल्या अहवालात म्हटले होते की, दोन पदव्यांच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना एकाच वेळी प्रवेश देऊ नये. कारण त्यामुळे शैक्षणिक, प्रशासकीय व साधनसामग्रीचे प्रश्न निर्माण होतील. एखाद्या पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्याला त्याचवेळी डिप्लोमा, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा, पदव्युत्तर डिप्लोमा करण्यास परवानगी द्यावी.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणार तपासणी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, फरकान कमर यांच्या समितीने दिलेल्या अहवालावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वैधानिक समितीने आपला अनुकूल अभिप्राय दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला एकाच वेळी दोन पदव्यांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातील विचार त्यावेळी बासनात गुंडाळला गेला. मात्र, आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच वेळी दोन पदव्यांचा अभ्यास करणे कदाचित शक्य होऊ शकते. त्या सर्व शक्यतांचा विचार करण्यासाठी नवी समिती नेमण्यात आली आहे.

Web Title: Think about letting you study two titles simultaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.