इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकच्या खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या भगिनी कनिमोळी यांच्या एका विधानामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. काही काळापूर्वी स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची खिल्ली उडवल्यानंतर आता कनिमोळी यांनी मारुतीरायाची खिल्ली उडवली आहे. एका सभेला संबोधित करताना कनिमोळी म्हणाल्या की, मारुती पहिल्यांदा चंद्रावर गेला होता, असे सांगणारे नेते तामिळनाडूमध्ये नाहीत ही चांगली बाब आहे. नाहीतर चंद्रावर आमची आजी गेली होती आणि ती तिथेच थांबली आहे, असंही त्यांनी सांगितलं असतं असा टोला, कनिमोळी यांनी लगावला.
त्यांनी पुढे सांगितले की, तामिळनाडूमधील मुलांना विचारलं की, चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं होतं तर ते नील आर्मस्ट्राँग असं उत्तर देतील. मात्र उत्तर भारतातील काही नेत्यांना विचारलं तर ते सांगतील की, हनुमान सर्वप्रथम चंद्रावर गेला होता. त्यानंतर कनिमोळी यांनी आजीबाईंच्या कहाण्यांना लक्ष्य करत सनातन धर्मातील परंपरांची खिल्ली उडवली. दरम्यान, डीएमकेच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता आणि धर्माची खिल्ली उडवण्यात आल्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही डीएमकेच्या नेत्यांनी सनातन धर्माची खिल्ली उडवलेली आहे. द्रविड आंदोलनाच्या नावावर डीएमकेकडून कधी रामायणातील पात्रांना लक्ष्य केलं जातं. तर कधी कधी देव-देवतांची खिल्ली उडवली जाते. यावेळी कनिमोळी यांनी मारुतीला लक्ष्य केलं गेलं आहे.कनिमोळी यांनी पुढे सांगितलं की, तमिळ संस्कृती आक्रमकांनाही तोडता आलेली नाही. तसेच द्रविड आंदोलन ही तमिळांच्या अधिकारांचा आवाज आहे. दरम्यान, हे व्होट बँकेचं राजकारण असून, त्यासाठी सनातन धर्मातील देवदेवता आणि परंपरांना लक्ष्य केलं जात असल्याचं राजकीय क्षेत्रातील जाणकारांनी म्हटलं आहे. तर कनिमोळी यांच्या विधानाविरिोधात सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हे विधान सनातनविरोधी मानसिकतेतून आलेलं आहे, अशी टीता तकण्यात येत आहे.इतर धर्मांवर टीका केली असती तर माफी मागावी लागली असती. मात्र हिंदू धर्माविरोधात असं काही बोलल्यास ती गंमत समजली जाते, असे एका युझरने म्हटले आहे. तर कनिमोळी यांच्या विधानावर भाजपासह विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. तसेच डीएमकेचा अजेंडा हा सनातनविरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.