‘ऑनलाईन’साठी सुविधा नाही; मुख्याध्यापकाने सुरू केले ‘लाऊडस्पीकर वर्ग’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 02:32 AM2020-06-26T02:32:37+5:302020-06-26T02:32:56+5:30

ते चक्क लाऊडस्पीकरवर यशस्वीरीत्या वर्ग घेत आहेत. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण मुख्याध्यापक गांधी यांनी सिद्ध केली आहे.

There is no facility for ‘online’; Headmaster launches 'Loudspeaker Class' | ‘ऑनलाईन’साठी सुविधा नाही; मुख्याध्यापकाने सुरू केले ‘लाऊडस्पीकर वर्ग’

‘ऑनलाईन’साठी सुविधा नाही; मुख्याध्यापकाने सुरू केले ‘लाऊडस्पीकर वर्ग’

Next

डुमका : ‘शिक्षक जग बदलू शकतो’, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय झारखंडच्या डुमका जिल्ह्यातील मुख्याध्यापक श्यामकिशोर सिंग गांधी यांनी दिला आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या त्यांच्या शाळेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. गरिबीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना स्मार्टफोन घेणे परवडणारे नाही. त्यामुळे आॅनलाईन वर्ग येथे शक्य नाहीत. यावर गांधी यांनी स्मार्ट उपाय शोधला. ते चक्क लाऊडस्पीकरवर यशस्वीरीत्या वर्ग घेत आहेत. ‘इच्छा तेथे मार्ग’ ही म्हण मुख्याध्यापक गांधी यांनी सिद्ध केली आहे.
कोविड-१९ साथीमुळे सर्व ठिकाणच्या शाळा बंद आहेत. अनेक शाळांनी मोबाईलवर आॅनलाईन वर्ग सुरू केले आहेत. तथापि, दुर्गम भारतात स्मार्ट फोनचाच अभाव असल्यामुळे आॅनलाईन वर्गही शक्य नाहीत. त्यामुळे बहुतांश सर्वच ग्रामीण भागात आॅनलाईन वर्ग सुरू होऊ शकलेले नाहीत. श्यामकिशोर सिंग गांधी यांनी मात्र या अभावावर यशस्वी मात केली आहे. झारखंडच्या डुमका जिल्ह्यातील बनकाठी गावातील माध्यमिक शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. मुलांना शिकवायचेच या ध्येयाने पछाडलेल्या गांधी यांनी अनेक लाऊडस्पीकर लावून शाळा सुरू केली. १६ एप्रिलपासून ते दररोज दोन तास लाऊडस्पीकरवरील शाळा भरवीत आहेत. विविध ठिकाणची झाडे आणि भिंतींना लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरजवळ बसून विद्यार्थी या अनोख्या शाळेत धडे गिरवत आहेत. कोरोना विषाणूच्या साथीचा फैलाव झाल्यानंतर मार्चच्या मध्यापासून संपूर्ण भारतातील हजारो शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. येथील शाळा मात्र अनोख्यापद्धतीने सुरू आहे.
गांधी यांनी सांगितले की, गावात ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी लाऊडस्पीकर बसविण्यात आले आहेत. पाच शिक्षक आणि दोन सहशिक्षक वर्गात बसून माईकवरून शिकवितात. आता शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही याअनोख्या शाळेत रुळले आहेत.
गांधी यांनी सांगितले की, पहिली ते आठवी या वर्गात २४६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २०४ विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाहीत. त्यामुळे आम्ही लाऊडस्पीकरचा पर्याय निवडला. सकाळी १० वा. आमची शाळा सुरू होते.
विद्यार्थ्यांना न समजलेल्या विषयांचा निपटारा करण्याचीही सोय शाळेने केली आहे. गांधी यांनी सांगितले की, एखाद्या विद्यार्थ्याला काही शंका असेल अथवा त्याचे काही प्रश्न असतील तर तो गावातील जवळच्या एखाद्याच्या मोबाईलवरून आमच्यापर्यंत पोहोचवतो. संबंधित शिक्षक दुसऱ्या दिवशी लाऊडस्पीकरवरून या शंकांचे निरसन करतात.
गांधी यांनी सांगितले की, हे प्रारूप काम करीत आहे. जे शिकविले जात आहे, ते विद्यार्थी उत्तम प्रकारे ग्रहण करीत आहेत. गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले की, आमच्या गावातील विद्यार्थी ग्रहणक्षम आहेत. नव्या पद्धतीच्या अभ्यासाचा ते आनंद घेत आहेत.
डुमका जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षणाधिकारी पूनम कुमारी यांनी मुख्याध्यापक गांधी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी सांगितले की, येथील सर्व २,३१७ सरकारी शाळांनी या प्रारूपाचा स्वीकार करून शिक्षण कार्य सुरू ठेवायला हवे. असे वर्ग सुरू केल्यास लॉकडाऊन उघडल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. लाऊडस्पीकरवरून वर्ग घेण्याचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. डुमका जिल्ह्यातील सर्व शाळांनी या संकल्पनेचा स्वीकार करायला हवा. ही पद्धती समजून घेण्यासाठी आपण लवकरच त्या शाळेला भेट देऊ.
>इंटरनेट कनेक्टिव्हिटीचीही समस्या
मोठी शहरे आणि नगरेही लॉकडाऊनचा सामना करताना संघर्ष करीत असली तरी त्यांचा संघर्ष हा दुर्गम आणि ग्रामीण भागाएवढा कठोर नाही. बहुतांश शहरांत, तसेच छोट्या नगरांत आॅनलाईन वर्ग नियमित सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र आॅनलाईन वर्ग सुरू करण्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. येथील मुख्य समस्या स्मार्टफोन आणि संगणकांची आहे. याशिवाय इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहेच. फोन अथवा संगणक असूनही कनेक्टिव्हिटीअभावी आॅनलाईन वर्ग सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी नुसतेच बसून आहेत. त्यांच्यासाठीमुख्याध्यापक गांधी यांचेप्रारूप उत्तम पर्यायठरू शकते.

Web Title: There is no facility for ‘online’; Headmaster launches 'Loudspeaker Class'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.