नवी दिल्ली - जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. धनखड यांचा राजीनामा अशावेळी आला जेव्हा संसदेचे पावसाळी अधिवेशनाचा १ दिवस झाला होता. त्यात तब्येतीचं कारण देत राजीनामा देण्याची बाब अनेक राजकीय विश्लेषकांना पटली नाही. उपराष्ट्रपती यांच्या राजीनाम्याचे टायमिंग पाहून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काहींच्या मते, उपराष्ट्रपती धनखड आणि सरकार यांच्यात सर्वकाही ठीक नाही. ही नाराजी इतकी वाढली की धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला तर मध्यंतरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सरकारच्या भूमिकेशी उपराष्ट्रपती धनखड सहमत नव्हते. हा मुद्दा त्यांनी जाहीर व्यासपीठावरही मांडला होता. त्यातून झालेल्या संघर्षातून धनखड यांनी राजीनामा दिला असं काहींचे म्हणणे आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड सक्रियतेने कामकाजात पाहायला मिळाले. संसदेत त्यांनी अनेक बैठकाही घेतल्या. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची भेट घेतली. त्यावेळीही धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख केला नाही. परंतु त्यानंतर ३ तासांत धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला.
इतकेच नाही तर जगदीप धनखड यांचा हा निर्णय न पटण्याचं कारण म्हणजे त्यांचे पूर्वनियोजित दौरे, २३ जुलैला धनखड राजस्थानच्या जयपूर दौऱ्यावर जाणार होते. जिथे उपराष्ट्रपती रिअल इस्टेट डेव्हलपर्स संघाशी संवाद साधणार होते. उपराष्ट्रपती सचिवालयाकडून या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली होती. राजकीय विश्लेषक आशुतोष सांगतात की, धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणाने झाला नाही हे मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो. मागील काही दिवसांपासून जे घडत होते त्यामुळे ते व्यथित झाले होते. धनखड सरकारच्या भूमिकेमुळे नाराज होते. त्यांनी बऱ्याचदा त्यांची नाराजी काही लोकांसमोर बोलून दाखवली असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय पुढील २-४ दिवसांत सर्व काही स्पष्ट होईल असंही ते म्हणाले.
दरम्यान, आणखी एका ज्येष्ठ पत्रकारानेही यावर प्रतिक्रिया दिली. मी दीर्घ काळापासून जगदीप धनखड यांना ओळखतो. त्यांच्या कार्यशैलीबाबत मला बरीच माहिती आहे. ते भारताचे सर्वात स्पष्टवक्ते उपराष्ट्रपती राहिलेत, ते फायटर आहेत आणि हार मानणारे नाहीत. त्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा तब्येतीच्या कारणावरून नक्कीच नाही. यामागे खूप मोठे कारण दडले आहे. प्रकृतीच्या कारणांचा हवाला दिला जात आहे परंतु तब्येतीबाबत एका दिवसांतच कळालं हे पटत नाही. त्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावरच राजीनामा देणे, ही वेळ काहीतरी वेगळेच सांगते असं पत्रकार विजय त्रिवेदी यांनी म्हटलं.
काँग्रेस खासदारांनाही बसला धक्का
काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी म्हटलं की, ही बातमी आमच्यासाठी शॉकिंग आहे कारण संध्याकाळी ५.४५ वाजता मी त्यांच्या केबिनमधून बाहेर पडलो होतो. माझ्यासोबत जयराम रमेश, प्रमोद तिवारीही होते. आमची न्या. वर्माविरोधात महाभियोगाच्या मुद्द्यावर चर्चाही झाली. परंतु त्यावेळी उपराष्ट्रपतींची तब्येत खराब आहे असं दिसले नाही. ते निष्पक्षतेने सभागृह चालवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांचा राजीनामा देशातील राजकारणात एक धक्का मानला जात आहे असं सांगितले. तर उपराष्ट्रपतींचा राजीनामा रहस्यमय आहे. संध्याकाळी ५ पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. धनखड यांनी त्यांच्या तब्येतीला प्राधान्य दिले पाहिजे यात दुमत नाही परंतु त्यांच्या राजीनाम्यामागे बरेच काही लपलंय असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले.