जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. तसेच भारताने आक्रमक कारवाईचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून मोठी धावपळ सुरू झालेली आहे. एकीकडे भारताचं आव्हान असतानाच दुसरीकडे अंतर्गत बंडखोरांनीही पाकिस्तानच्या लष्कराचा जेरीस आणलं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशांतर्गत बंडखोरांना इशारा देताना बलुचिस्तान हा पाकिस्तानचा मुकुटमणी असून, पुढच्या १० पिढ्या सुद्धा त्याला वेगळा करू शकणार नाहीत, असे म्हटले होते.
त्याला आता बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात झालेला लाजीरवाणा पराभव आणि ९० हजार सैनिकांनी केलेल्या आत्मसमर्पणाला विसरता कामा नये. केवळ त्यांची शस्त्रास्त्रेच नाही तर त्यांचे पायजमेसुद्धा आज तिथेच टांगलेले आहेत.
त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर बलुचींना १० पिढ्यांपर्यंत शिक्षा देण्याचा इशारा देत आहे. मात्र पाकिस्तानी सैन्याच्या किती पिढ्या बंगाल्यांकडून झालेल्या त्या ऐतिहासिक पराभवाला आठवणीत ठेवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अख्तर मेंगल पुढे म्हणाले की, बलूच जनता मागच्या ७५ वर्षांपासून पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचे अत्याचार सहन करत आहे. आम्ही असे लोक आहोत जे तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक अत्याचाराची आठवण ठेवणारे आहोत. तसेच तुमच्या कुठल्याही धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असा इशाराही मेंगल यांनी दिला.