एअर इंडिया या विमान कंपनीचे शुक्लकाष्ट संपतच नाहीये. रविवार, ३ ऑगस्ट रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान 'एआय ५००' उड्डाणापूर्वी केबिनमधील वाढलेल्या तापमानामुळे रद्द करण्यात आले. एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे. नुकत्याच झालेल्या ऑडीटमध्ये विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएला टाटा समूहाद्वारे चालवल्या जाणाऱ्या एअर इंडियामध्ये १०० हून अधिक उल्लंघने आढळली आहेत, ज्यात काही गंभीर सुरक्षा धोक्यांचा समावेश आहे. हा अहवाल समोर आला असतानाच ही घटना घडली आहे.
एअर इंडियाने रद्द झालेल्या या विशिष्ट विमानातील प्रवाशांची संख्या, विमानाचा प्रकार किंवा त्याची नियोजित प्रस्थान वेळ याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्या माहितीनुसार, हे विमान एअरबस ए३२१ प्रकारचे होते आणि दुपारी १२.३५ वाजता उड्डाण करून दिल्लीत दुपारी २.५५ वाजता पोहोचणार होते.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, "३ ऑगस्ट (रविवार) रोजी भुवनेश्वरहून दिल्लीला जाणारी फ्लाइट एआय ५०० ही तांत्रिक समस्येमुळे रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रस्थानापूर्वी केबिनचे तापमान खूप जास्त झाले होते. भुवनेश्वरमधील आमची विमानतळ टीम प्रभावित प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थान अर्थात दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यास मदत करत आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत."
या घटनेच्या काही काळापूर्वी, एअर इंडियाची सिंगापूरहून चेन्नईला जाणारी फ्लाइट एआय ३४९ देखील प्रस्थानापूर्वी देखभालीच्या कामामुळे रद्द करण्यात आली होती, ज्यासाठी अतिरिक्त वेळेची आवश्यकता होती.
DGCA च्या तपासात धोके उघडसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या प्रशिक्षण, क्रू विश्रांती आणि कर्तव्य कालावधीचे नियम, हवाई क्षेत्र पात्रता इत्यादींशी संबंधित सुमारे १०० उल्लंघने आणि निरीक्षणे आढळून आली. यापैकी सात उल्लंघने लेव्हल-१ उल्लंघने अर्थात अधिक धोकादायक नियमांचे उल्लंघन असल्याचे समोर आले आहे.
विमान कंपन्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्हगेल्या महिन्यात झालेल्या एका ऑनलाइन पॅन-इंडिया सर्वेक्षणात असे आढळून आले की, जवळजवळ ७६ टक्के प्रतिसादकर्त्यांचे मत होते की भारतातील अनेक विमान कंपन्या सुरक्षेपेक्षा प्रमोशनवर जास्त खर्च करत आहेत. लोकलसर्कलने केलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की, ६४ टक्के प्रतिसादकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत किमान एकदा तरी अशा उड्डाणाचा अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये टेकऑफ, लँडिंग किंवा उड्डाणादरम्यान विमानांमध्ये बिघाड झाला होता.