मागच्या काही काळात घटत असलेल्या वनक्षेत्रामुळे हत्ती, वाघ, बिबटे आदि वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीमध्ये होणारे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी असा एक संघर्ष उभा राहिला आहे. बिबट्यासारखा एखादा हिंस्र प्राणी गावातील वस्तीत घुसल्यावर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र गावात बिबट्या घुसल्यानंतर एका शेतकऱ्याने केलेल्या कृत्याची सध्या एकच चर्चा सुरू आहे.
त्याचं झालं असं की, कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यातील चिक्काकोट्टीगेहल्ली नावाच्या एका गावात बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेतली. याचदरम्यान, बिथरलेल्या बिबट्याने तिथे असलेल्या महिला आणि मुलांच्या दिशेने चाल केली. तेव्हा योगानंद नावाच्या ४३ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता मोठ्या हिमतीने बिबट्याची शेपटीच पकडली. त्यानंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संधी साधक बिबट्याला पकडले. आता या बिबट्याची रवानगी ही म्हैसूरमधील एका रेस्क्यू सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
हा बिबट्या गावातील शेतांजवळ फिरत असल्याचं काही ग्रामस्थांनी पाहिलं. या बिबट्याने आधीही काही पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. बिबट्या दिसल्यावर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे १५ सदस्यीय पथक गावात दाखल झाले. या पथकाने बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर बिबट्या अचानक झाडीमधून बाहेर आला. तसेच त्याने महिला आणि मुलांच्या दिशेने चाल करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात योगानंद याने धाडस करून बिबट्याची शेपटी पकडली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्यावर नियंत्रण मिळवत त्याला जेरबंद केलं.
याबाबत योगानंद याने सांगितले की, बिबट्या चाल करून येत असल्याने महिला आणि मुलांना धोका निर्माण होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलं. जर बिबट्याने हल्ला केला असता तर अनेकजण जखमी झाले असते. बिबट्या दबक्या पावलांनी चालत असल्याचे मी पाहिले. कदाचित त्याची प्रकृती ठिक नसावी. मी देवाचं नाव घेतलं आणि त्याची शेपटी अगदी जोरात पकडली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळं टाकत बिबट्याला ताब्यात घेतलं.