कर्नाटकमध्ये कौटुंबिक वादातून भावा-भावांच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथे कौटुंबिक वाद आणि भांडणांमुळे मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावाच्या हत्येचा कट रचून सुपारी दिली. तसेच हत्येनंतर पोलिसांच्या नजरेतून वाचता यावे यासाठी प्रयागराजा येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी गेला. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीचं बिंग फुटलं. तसेच कुंभमेळ्याहून परतताच पोलिसांनी आरोपी भावाला बेड्या ठोकल्या.
ही धक्कादायक घटना कर्नाटकमधीली मांड्या जिल्ह्यातील मड्डूर तालुक्यात घडली आहे. येथे ११ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षीय शेतकरी कृष्णे गौडा यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्याचा मोठा भाऊ शिवानंजे गौडा याने ५ लाख रुपयांची सुपारी देऊन धाकट्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णे गौडा हा कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर हे कर्ज मोठ्या भावाने फेडलं होतं. त्याबदल्यात कृष्णे गौडा हा आपली मालमत्ता मोठ्या भावाच्या पत्नीच्या नावावर करेल, असं ठरलं होतं. मात्र त्याने असं करण्यास नकार दिला. तसेच कोर्टात दावा दाखल केला. याशिवाय तो आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीबाबत वाईटसाईट बोलत होता. त्यामुळे कुटुंबातील वाद आणखीनच वाढला.
त्यानंतर शिवानंजे गौडा याने चंद्रशेखर, सुनील, उल्हास, प्रताप अभिषेक, श्रीनिवास आणि हनुमेगौडा यांना आपल्या धाकट्या भावाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. मांड्याचे एसपी मल्लिकार्जुन बलादांडी यांनी सांगितले की, हत्येच्या एक दिवस आधी कुणाला संशय येऊ नये म्हणून शिवानंजे गौडा हा प्रयागराजला गेला. मात्र कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुराव्यांमुळे पोलिसांनी त्याचा हत्येतील सहभाग उघड करून त्याला बेड्या ठोकल्या.