पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर टीका केली. मेहबुबा मुक्ती म्हणाल्या,'अदूरदर्शी राजकारणी आणि खऱ्या राजकारणीमध्ये फरक असतो. २००३ मध्ये, तत्कालीन भाजप पंतप्रधान वाजपेयी यांनी श्रीनगर भेटीदरम्यान पीडीपीकडे फक्त १६ आमदार असतानाही मुफ्ती साहेबांच्या शांतता आणि प्रतिष्ठेच्या दृष्टिकोनावर मोठा विश्वास दाखवला. आज आपल्या मुख्यमंत्र्यांनी ५० आमदार असूनही, ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा हिरावून घेणाऱ्या दिल्लीच्या एकतर्फी कारवाईचे समर्थन करण्यासाठी आणि सामान्यीकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
श्रीनगर ते सोनमर्ग यांना जोडणाऱ्या सर्व हवामानात चालणाऱ्या झेड-मोर बोगद्याच्या उद्घाटन प्रसंगी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला देखील उपस्थित होते. उमर अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे सीमेवर शांतता प्रस्थापित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यासोबतच, उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याची मागणी केली. उमर अब्दुल्ला म्हणाले की, त्यांचे मन त्यांना सांगत आहे की नरेंद्र मोदी लवकरच राज्याचा दर्जा पुनर्संचयित करतील. उमर अब्दुल्ला यांचे हे विधान मेहबूबा मुफ्ती यांना आवडले नाही. यानंतर त्यांनी उमर अब्दुल्ला यांच्यावर उघडपणे टीका केली.
उमर अब्दुल्ला यांच्या या विधानानंतर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते आनंद दुबे म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला भाजपच्या बी टीमसारखे वागत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी इंडिया अलायन्स बंद करायला हवे असे विधान केले होते. निवडणुकीपूर्वी उमर अब्दुल्ला पंतप्रधान मोदींवर टीका करायचे आणि आज ते पंतप्रधान मोदींचे कौतुक करत आहेत, अशी टीका केली.