ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि, ३० - लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवून नवा राजकीय इतिहास घडवणा-या भारताचे पंधरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील काही प्रसंग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत मोदींनी आक्षेप दर्शवला आहे. भारताल अनेक महान व्यक्तींच्या कर्तृत्वाचा इतिहास लाभल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अशा महान लोकांचा अभ्यास करावा, असे नमूद करत शालेय पुस्तकांत जिवंत माणसांवरील धडे नकोत असे मोदींनी सांगितले आहे. ट्विटरद्वारे मोदींनी हे मत व्यक्त केले आहे. मोदींच्या जीवनातील काही प्रसंगांचा शालेय अभ्यासक्र मात समावेश करण्याचा मध्यप्रदेश सरकारचा इरादा आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी हे मत मांडले.
' देशातील काही राज्यांना माझ्या जीवनातील संघर्षाचे प्रसंग, शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची इच्छा असल्याचे मी वाचले. मला असे ठामपणे वाटते की शालेय अभ्यासक्रमात जिवंत लोकांवरील धड्यांचा समावेश नसावा. भारताच्या इतिहासात अनेक महान, कर्तृत्ववान माणसे होऊन गेली. आजच्या तरूण पिढीने तरूणांनी त्यांचा अभ्यास करून, त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी,' असे ट्विट मोदींनी केले आहे.