पुलवामा : जगभरात ईद शांततेत साजरी केली जात असताना काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पुलवामातील एका घरामध्ये ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांनी घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी पुलवामातील ज्या घरात घुसले होते त्या घरामध्ये ईद साजरी केली जात होती. त्यांना कळण्याच्या आतच दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला आणि फरार झाले. यामध्ये नगीना नावाची महिला ठार झाली असून भारतीय जवानांनी या दहशतावाद्यांची शोधमोहिम हाती घेतली आहे. नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती.
गेल्या महिन्यात एका चकमकीवेळी हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर झाकीर मुसा ठार झाला होता. तो A++ प्रकारातील दहशतवादी होता. त्याच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. झाकीर मुसा दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुराच्या त्राल भागातील राहणारा होता.