पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेच्या तयारीवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही समाजकंटकांनी पूजा मंडप आणि मूर्तींना आग लावली आहे. गुरुवारी रात्रीनंतरची ही घटना आहे. रात्री २ वाजेपर्यंत आम्ही जागे होतो, पहाटे चार वाजता मंडपाला कोणीतरी आग लावल्याचे आम्हाला समजल्याचा आरोप तेथील पुजाऱ्यांनी केला आहे.
गोबरडांगा पोलिस स्टेशन हद्दीतील बारगम कचरीबारी परिसरात ही घटना घडली आहे. अग्रदूत संघाकडून गेल्या ४० वर्षांपासून पूजा आयोजित केली जाते. सदस्यांना आणि शेजाऱ्यांना पंडालच्या मागे आग लागल्याचे दिसले. मूर्तींचा काही भाग जळलेला होता. सकाळी ही बातमी पसरताच परिसरात तणाव निर्माण झाला होता.
एसडीपीओ हाब्रा आणि गोबरडांगा पोलिस स्टेशनच्या कार्यवाहक एसएचओ पिंकी घोष घटनास्थळी पोलीस फौजफाट्यासह आले होते. यानंतर स्थानिकांनी रस्ता रोखून निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात आग लावल्याने ती कोणी लावली आणि का लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. रविवारी रामनवमीची मिरवणूक काढली जाणार आहे. या निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लागणार असल्याने या दिवशीची आयपीएल मॅच रद्द करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे उंच इमारतींवर लक्ष ठेवले जात आहे.
दुसरीकडे राणाघाटमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीपूर्वी पोस्टर्सवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी सुवेंदू परत जा असे पोस्टर्स लावण्यात आले होते. सुवेंदू अधिकारी हे बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असून ते सध्या नादिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यामुळे टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ही कुरघोडी केली आहे.