पर्वणीच्या फेरनियोजनात तात्पुरता दिलासा (सीडीसाठी)
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार्या दुसर्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी पर्वणीचे फेरनियोजन करण्याचे ठरविणार्या प्रशासनाने फक्त नाशिकरोडला येणार्या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविले. त्यामुळे दुसर्या पर्वणीला तरी पोलीस बॅरिकेडिंगचे भय कमी होईल अशी आशा बाळगून असलेल्या शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली.
पर्वणीच्या फेरनियोजनात तात्पुरता दिलासा (सीडीसाठी)
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणार्या दुसर्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी पर्वणीचे फेरनियोजन करण्याचे ठरविणार्या प्रशासनाने फक्त नाशिकरोडला येणार्या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविले. त्यामुळे दुसर्या पर्वणीला तरी पोलीस बॅरिकेडिंगचे भय कमी होईल अशी आशा बाळगून असलेल्या शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकार्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. या बैठकीच्या प्रारंभीच पहिल्या पर्वणीला भाविकांची गर्दी होती, परंतु दुसर्या पर्वणीला चारपट भाविक येण्याची शक्यता विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी व्यक्त केली व पहिल्या पर्वणीच्या नियोजनात राहून गेलेल्या उणिवा दूर करण्यासाठी तसेच नागरिकांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी बैठक बोलविण्यात आल्याचे जाहीर केले. लोकप्रतिनिधींच्या सूचना व पहिल्या पर्वणीच्या काळात ज्या काही बाबी लक्षात आल्या त्यावरून प्रशासनाने काही बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यात नाशिकरोडच्या भाविकांची झालेली पायपीट कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेले नियोजन त्यांनी सांगितले त्याचबरोबर शहरातील दुचाकी वाहनांसाठी इदगाह मैदान, डोंगरे वसतिगृह आदि ठिकाणी पार्क करता येतील काय या दृष्टीने चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले. शहरात कमीत कमी बॅरिकेडिंग करण्यावर भर असेल; परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यात तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. १२ व १३ सप्टेंबर रोजी अमावास्या असल्याने दोन दिवस भाविकांची स्नानासाठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी, १२ रोजी पोळा सण व सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील भाविक येण्याची शक्यता कमी आहे; परंतु परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील त्यामुळे पहिल्या पर्वणीला असलेले बा वाहनतळ मात्र कायम राहतील व त्याच ठिकाणी खासगी वाहने उभी करावी लागतील असेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारच्या सूचना तसेच काही तक्रारीही केल्या त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण जगाचे या सोहळ्याकडे लक्ष लागून असल्यामुळे त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा विचार करता येत्या एक -दोन दिवसांत त्यापैकी काय काय करता येईल याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, जिवा पांडू गावित, बाळासाहेब सानप, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष अनघा फडके, शिवाजी चुंभळे, विजय करंजकर, राजू देसले, कविता कर्डक यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, मेळा अधिकारी रघुनाथ गावडे, महेश पाटील, उदय किसवे यांच्यासह सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.