तेलुगू देसम रालोआतून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:55 AM2018-03-17T06:55:01+5:302018-03-17T06:55:01+5:30

तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्या पक्षाने लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.

 Telugu Desh Out Of Naco | तेलुगू देसम रालोआतून बाहेर

तेलुगू देसम रालोआतून बाहेर

googlenewsNext

नवी दिल्ली : तेलुगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केल्यानंतर त्या पक्षाने लोकसभेत मोदी सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. काँग्रेस, डावे पक्ष यांच्यासह वायएसआर काँग्रेसने या ठरावाला पाठिंबा दिला असून, दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. मोदी सरकारवरील हा पहिला अविश्वास ठराव आहे.
विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पार्टीतर्फे सातत्याने केली जात होती. मोदी सरकारने ती मान्य न केल्याने त्या पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला. त्यानंतर आज पक्षाने रालोेआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. लोकसभेतील तेलगू देसमचे नेते नरसिम्हम म्हणाले की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून, त्यासाठी रालोआतून बाहेर पडत आहोत. आम्ही अविश्वास ठराव दिला आहे.
तेलगू देसमने म्हटले की, वायएसआर काँगे्रसचे खा. विजयसाई रेड्डी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून, दोन्ही पक्षांत आघाडीचे संकेत दिले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या अविश्वास ठरावावर विश्वास नाही. आम्ही स्वत:च अविश्वास ठराव दाखल करीत आहोत. सोमवारपर्यंत आम्हाला ठरावावर ५४ खासदारांच्या सह्या मिळतील.
>यांचा पाठिंबा, शिवसेनेचे काय?
५३६ सदस्यांच्या लोकसभेत भाजपाकडे २७४ सदस्य आहेत. त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान ५० सदस्यांचा पाठिंबा व सह्या आवश्यक आहेत. तेलगू देसमकडे १६ व वायएसआरकडे ९ सदस्य आहेत. याखेरीज राष्ट्रीय जनता दल, सपा, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट, अण्णा द्रमुक तृणमूल काँग्रेस यांचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना सातत्याने मोदी सरकार व भाजपावर टीका करीत असली तरी अविश्वास ठरावाबाबत काय भूमिका घेणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. अनेकांच्या मते शिवसेना ठरावाला थेट पाठिंबा देण्याची शक्यता नाही. कदाचित मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्याचा निर्णय शिवसेना घेऊ शकेल.
संपूर्ण देशाचा मोदी यांच्यावर व केंद्र सरकारवर विश्वास आहे आणि आमच्याकडे आवश्यक संख्याबळही आहे. या ठरावाचा काहीही उपयोग होणार नाही.
- अनंतकुमार, संसदीय कार्यमंत्री
माकपचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले की, या ठरावाला आमचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पाठिंबा देताना तेलगू देसम व वायएसआर काँग्रेस यांनी राजकारण करू नये, असे आवाहन केले.
>वायएसआरविषयी तेलगू देसमला शंका
वायएसआर काँग्रेसने गुुरुवारीच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्यास पाठिंबा देण्याची घोषणा गुरुवारी करणाऱ्या तेलगू देसमने आज स्वत:ही अविश्वास प्रस्ताव सादर केला. वायएसआर व भाजपा यांची हातमिळवणी असल्याचा तेलगू देसमला संशय आहे.

Web Title:  Telugu Desh Out Of Naco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.