ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २२ - बंगळुरु येथे नर्सरीत शिकणा-या तीन वर्षाच्या चिमुरडीवर नराधम शिक्षकाने शाळेच्या आवारातच बलात्कार केल्याची संतप्त घटना मंगळवारी घडली. पिडीत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात बुधवारी सकाळी निदर्शने केली.
उत्तर बंगळुरुतील ख्यातनाम आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळेत नर्सरीमध्ये शिकणारी तीन वर्षाची चिमुरडी मंगळवारी संध्याकाळी घरी परतत असताना रडत होती. तिच्या वडिलांनी तिला विचारणा केली मात्र ती काही बोलत नव्हती. घरी परतल्यावर तिच्या आईला मुलीच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या. यानंतर मुलीच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 'शाळेतील शिक्षकाने हे कृत्य केले' ऐवढीच माहिती तिने आईला दिली होती. या आधारे पोलिसांनी शाळेतील शिक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शाळेतील काही शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 'सध्या पिडीत मुलीला मानसिक धक्का बसला असून तिला काहीच सांगता येत नाही. बुधवारी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पोलिस तिच्याशी बोलून आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करतील' असे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.
पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले असून शाळेत बाहेरील व्यक्ती आली नव्हती हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बलात्कार करणारा नराधम हा शाळेतील व्यक्तीच असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर पालकांमध्ये संताप पसरला असून बुधवारी सकाळी पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यापूर्वी जुनमध्येही बंगळुरुतील व्हिबग्योर या इंग्रजी शाळेत सहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.