लाखभर मिळकती कारवाईच्या रडारवर निवासी कर आकारणी ; प्रत्यक्षात वापर व्यावसायिक महापालिकेकडून तपासणी सुरू ( लोकमत विशेष )
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
पुणे : महापालिकेकडून मिळकतीचा निवासी वापर सुरू असल्याचे दाखवून प्रत्यक्षात संबधित मिळकत व्यावसायिक म्हणून वापर करून कोटयावधीचा मिळकतकर बुडविणा-यांना आता चाप बसणार आहे. अशा मिळकतधारकांची कुंडली तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी महावितरण, एलबीटी विभाग आणि सेवाकर तसेच व्हँटच्या खातेदारांची माहिती महापालिकेकडून या विभागांकडून मागविण्यात आली आहे. या माहितीवरून मिळकतीचा व्यावसायिक वापर सुरू असतानाही कर मात्र, निवासी स्वरूपाचा भरणा-याचे पितळ यामुळे उघडे पडणार आहे.
लाखभर मिळकती कारवाईच्या रडारवर निवासी कर आकारणी ; प्रत्यक्षात वापर व्यावसायिक महापालिकेकडून तपासणी सुरू ( लोकमत विशेष )
पुणे : महापालिकेकडून मिळकतीचा निवासी वापर सुरू असल्याचे दाखवून प्रत्यक्षात संबधित मिळकत व्यावसायिक म्हणून वापर करून कोटयावधीचा मिळकतकर बुडविणा-यांना आता चाप बसणार आहे. अशा मिळकतधारकांची कुंडली तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी महावितरण, एलबीटी विभाग आणि सेवाकर तसेच व्हँटच्या खातेदारांची माहिती महापालिकेकडून या विभागांकडून मागविण्यात आली आहे. या माहितीवरून मिळकतीचा व्यावसायिक वापर सुरू असतानाही कर मात्र, निवासी स्वरूपाचा भरणा-याचे पितळ यामुळे उघडे पडणार आहे. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नासाठी स्थानिक संस्था कर ( एलबीटी) पाठोपाठ मिळकतकर हा सर्वात प्रमुख स्त्रोत आहे. त्यातच एलबीटी बंद होणार असल्याने महापालिकेवर आर्थिक संकट कोसळयाची भिती आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या मिळकती शोधण्यात येत आहेत. शहरात जवळपास साडेसात लाख मिळकतींना महापालिकेकडून कर आकारणी केली जाते. त्यातील जवळपास पावने दोन लाख मिळकती व्यावसायिक कर आकारणी केली जाते. एकीकडे शहराची आर्थिक उलाढाल कोटयावधींनी वाढत असताना, दुसरीकडे मात्र, या व्यावसायिक मिळकतींचा आकडा गेल्या चार ते पाच वर्षात एवढयावरच स्थिरावला आहे. त्यामुळे पालिकेकडून या करबुडयांवर कारवाईसाठी कंबर कसण्यात आली असून लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.=========================महापालिकेच्या हददीतील सर्व इमारती व मोकळया जागांची कर आकारणी पालिकेकडून केली जाते. हा कर बसविण्यासाठी प्रत्येक मिळकतीचे वाजवी अंदाजेभाडे विचारात घेऊन वार्षिक करपात्र रक्कम निश्चित केली जाते. त्यात निवासी, बिगर निवासी ( व्यावसायिक ) , मोकळया जागा अशा प्रकारच्या बिलांचा समावेश आहे.त्यानुसार निवासी मिळकतीसाठी कमी तर व्यावसायिक मिळकतीसाठी जादा कर आकारला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात निवासी मिळकतींची कर आकारणी करून घेऊन या मिळकतींचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आला आहे. त्यात हॉटेल, लहान स्वरूपाची दुकाने, खासगी संस्थासाठीची ऑफीसेस, लहान आयटी कंपन्या, अंगणवाडया सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे दरवर्षी जवळपास 100 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. =======================शहरात अनेक मिळकतींचा व्यावसायिक वापर सुरू आहे. मात्र, कर निवासीच भरला जात आहे. या मिळकतींचा शोध घेण्यासाठी एलबीटी, सेवाकर, तसेच महावितरणला व्यावसायिक दराने वीज बिल भरणा-या ग्राहकांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वापर बदल करण्यात आलेल्या मिळकतींची माहिती समोर येण्यास मदत होईल. - सुहास मापारी (उपायुक्त.कर आकारणी व संकलन विभाग) आणखी चौकटी आहेत....