Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर टाटा ग्रुपने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त विमान एआय-१७१ मधील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने ५०० कोटी रुपयांचा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघातातील पीडितांसाठी विशेष ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा टाटा सन्सकडून करण्यात आली आहे. या ट्र्स्टच्या माध्यमातून मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना, जखमींना आणि अपघातामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्या सर्वांना तात्काळ मदत पुरवली जाणार आहे.
अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा ग्रुपने एक मोठे पाऊल उचलले आहे. टाटा सन्सने १८ जुलै रोजी मुंबईत एका सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टची नोंदणी पूर्ण केली आणि या ट्रस्टचे नाव 'AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट' ठेवण्याची घोषणा केली. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टने या ट्रस्टला प्रत्येकी २५० कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे, ज्यामध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत समाविष्ट आहे. ट्रस्टच्या कामात जखमींवर उपचार आणि अपघातात नुकसान झालेल्या बीजे मेडिकल कॉलेज वसतिगृहाच्या पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीत मदत करणे देखील समाविष्ट असेल.
या ट्रस्टचे व्यवस्थापन ५ सदस्यांच्या विश्वस्त मंडळाद्वारे केले जाईल. मंडळावर नियुक्त केलेले पहिले दोन विश्वस्त टाटा समूहाचे माजी दिग्गज एस. पद्मनाभन आणि टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा आहेत. त्याच वेळी, टाटा सन्सच्या जनरल कौन्सिलकडून लवकरच अतिरिक्त विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान काही मिनिटांतच कोसळले. विमान अहमदाबादमधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या छतावर कोसळले. या अपघातात, विमानातील एका व्यक्तीशिवाय सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, टाटा समूहाने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली होती. अपघातग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. विमानातील २४१ जण जागीच मृत्यूमुखी पडले तर विश्वास कुमार रमेश नावाचा एकच प्रवासी वाचला होता.