नवी दिल्ली : प्रतिबंधात्मक आयात कर (टेरिफ) आणि निर्बंध हे आता केवळ आर्थिक उपाय राहिलेले नसून, देशांसाठी आपल्या हितांचे रक्षण करणारे शक्तिशाली साधन बनले आहेत, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रायसीना संवादा’तील एका पॅनल चर्चेत जयशंकर यांनी सांगितले की, मागील एक दशकापासून वित्तीय प्रवाह, ऊर्जा पुरवठा आणि तंत्रज्ञान यांसारख्या आर्थिक बाबींचा झपाट्याने हत्याराच्या स्वरूपात वापर होत आहे. त्यातून जग एका नव्या आर्थिक समीकरणाच्या दिशेने चालले आहे. त्यात धोरणे आणि निर्बंध नव्या कालखंडातील रणनीतिक स्पर्धेचा भाग बनले आहे.
अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर आयात कर लादण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.