तिरुवनंतरपुरम - २०२२ मध्ये प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील एका न्यायालयाने सोमवारी एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावली. दोषी ग्रीष्मा (२४) हिने तिच्या शैक्षणिक कामगिरीचा, पूर्वीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचा आणि तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याचा दाखला देत शिक्षेत सौम्यतेची विनंती केली होती.
न्यायालयाने ५८६ पानी निकालात म्हटले आहे की, गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता दोषीच्या वयाचा विचार करण्याची गरज नाही. तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील परसाला येथील मूळ रहिवासी असलेल्या शेरोन राजच्या हत्येप्रकरणी ग्रीष्माला शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाला आढळले की, दोषीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि तिने नियोजनपूर्वक गुन्हा करण्याचा कट रचला होता. याआधीही आरोपीने तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. ग्रीष्माचा गुन्हेगारी इतिहास नसल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला. २२ ऑगस्ट २०२२ रोजी तिने फळांच्या रसातून शेरोनला विष देण्याचा प्रयत्न केला होता.