नवी दिल्ली- देशात श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या जगन्नाथ मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बूट घालून आणि शस्त्रास्त्र घेऊन पोलिसांनी जगन्नाथ मंदिरात प्रवेश करू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मंदिरात भाविकांसाठी असलेल्या दर्शन रांगेत 3 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारावर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी सरकारनंही न्यायालयात या प्रकरणासंबंधित माहिती दिली आहे. जगन्नाथ मंदिरातील झालेल्या हिंसाचार प्रकरणात 47 लोकांना अटक करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. जगन्नाथ मंदिर परिसरात कोणताही हिंसाचाराचा प्रकार झालेला नाही.हिंसाचारात मंदिर प्रशासनाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. हे कार्यालय मंदिरापासून 500 मीटर लांब आहे. या प्रकरणात हिंसाचार झाला त्यावेळी पोलीस बूट घालून शस्त्रास्त्रांसह मंदिरात घुसले होते. त्यानंतर मंदिर परिसरात झालेल्या हिंसेत पोलीसही जखमी झाले होते.
शस्त्रधारी पोलिसांना जगन्नाथ मंदिरात नो एन्ट्री- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 18:02 IST