छत्तीसगड सरकारची गेमचेंजर योजना महतारी वंदन योजनेचा लाभ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीला मिळत असल्याची घटना समोर आली आहे. महतारी वंदन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीच्या नावाचा समावेश झाल्यानंतर राजकारणही चांगलंच तापलं आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. योजनेतून चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गेल्या १० महिन्यांपासून सनी लिओनी नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहा १००० रुपये दिले जात आहेत. सनी लिओनीला बस्तरमध्ये महतारी वंदन योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या महतारी वंदन योजनेच्या संकेतस्थळावर त्याच नावाने लाभार्थी नोंदणीकृत आहे. वेबसाईटवर नोंदणी क्रमांक MVY006535575 टाकल्यावर, लाभार्थीचं नाव सनी लिओनी आहे आणि तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स आहे. योजना सुरू झाल्यापासून, खात्यात दर महिन्याला १००० रुपये जमा केले जात आहेत.
बनावट नावं समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्तीसगडच्या माता-भगिनींच्या नावावर महतारी वंदनच्या नावाखाली सरकार मोठी भूमिका बजावत आहे, याची आम्हाला सुरुवातीपासूनच जाणीव होती. कोण आहे ही सनी लिओनी कोणाच्या खात्यात पैसे जात आहेत? त्याचा सूत्रधार कोण, हा तपासाचा विषय आहे. महतारी वंदनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच अशी प्रकरणं समोर येत आहेत.
दीपक बैज यांच्या वक्तव्यावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा आमदार सुशांत शुक्ला म्हणाले - "छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे ऐतिहासिक पाऊल आहे. काँग्रेस घाबरली आहे त्यामुळेच अशी विधानं करत आहेत. बस्तर परिसरात विसंगती आहे. अभिनत्रीच्या नावावर पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.
ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाइटवरून ही नोंदणी काढून खऱ्या लाभार्थीचा शोध सुरू केला. हे प्रकरण बस्तर ब्लॉकच्या तलूर पंचायतीशी संबंधित आहे. बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले की, माहिती मिळताच संबंधित बँक खातं होल्डवर ठेवण्यात आलं आहे. योजनेंतर्गत जाहीर केलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच या योजनेचा लाभ घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून आता गुन्हा दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.