नवी दिल्ली : संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीवरून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी पुन्हा एकदा तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारवर दोषारोपण केले. तत्कालीन संपुआ सरकारने केवळ राजकीय कारणांसाठी गुरूला फासावर चढविल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर बोलत होते. यावेळी त्यांनी हा आरोप केला. त्यांनी सांगितले की, मी माझ्या बहिणीसोबत दिल्लीच्या एका हॉटेलात रात्रीचे जेवण घेत होतो, त्याच वेळी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा फोन मला आला. मी गुरूच्या फाशीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली असून, उद्या सकाळी त्याला फासावर चढविण्यात येईल तेव्हा तुम्ही जम्मू-काश्मिरातील कायदा व व्यवस्था बघा, असे त्यांनी मला सांगितले. सगळे काही निश्चित आहे का? आता काहीही बदल होऊ शकणार नाही का? असे प्रश्न मी त्यांना केले; पण कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्याने आता काहीही होऊ शकत नाही, असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले. बेअंत सिंह व राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची प्रकरणे काँग्रेस सरकारने कशी हाताळली व गुरूचे प्रकरण कसे हाताळले, हे मी पाहिले. गुरूला राजकीय कारणांपोटी फासावर लटकविण्यात आले, हे मी आता म्हणू शकतो. गुरूला ९ फेबु्रवारी २०१३ रोजी फाशी देण्यात आली होती. फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दोषी कैद्यांच्या यादीत त्याचा क्रमांक २८ वा होता. गुरूच्या फाशीची माहिती त्याच्या कुटुंबाला मीडियाकडून मिळाली होती. यामुळे या फाशीवरून वाद निर्माण झाला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अफझलच्या फाशीमागे ‘राजकीय कारण’-ओमर
By admin | Updated: May 25, 2015 00:45 IST