प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या मध्य प्रदेशमधील सिहोर जिल्ह्यात असलेल्या कुबेरेश्वर धाम येथे मंगळवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष वितरण सुरू असताना ही दुर्घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रुद्राक्ष वितरण सुरू असताना भाविकांची गर्दी वाढल्याने ढकलाढकल सुरू झाली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गर्दीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते, अशी माहितीही समोर येत आहे.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर कुबेरेश्वर धाम येथे सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यानेही कुबेरेश्वर धाम येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.