नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना मागितले तेवढे सिंह त्यांनी आमच्या राज्याला दिले; पण यातील दोन सिंहांचा मृत्यू झाला आहे. याची चौकशी करण्याची मागणी मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी मंगळवारी लोकसभेत केली. उत्तर प्रदेशातील इटावामधील ‘लॉयन सफारी’त असलेल्या दोन सिंहांचा मृत्यू झाला. गुजरातने त्यावेळी उत्तर प्रदेशला चार सिंह दिले होते. लोकसभेत अत्यंत दु:खी स्वरात मुलायमसिंह यांनी हे दोन सिंह मृत्युमुखी पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मी आणि अखिलेश यांनी हे सिंह आवर्जून मागून घेतले होते. सिंह दिल्याबद्दल मी मोदी यांचे आभार मानतो. या ठिकाणी चांगले डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत आणि या सिंहांचा मृत्यू का झाला, याची चौकशीही करावी. आमच्याकडून सिंहांच्या देखभालीमध्ये काही चूक झाली असेल, तर आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. पर्यावरणमंत्री अनिल माधव म्हणाले, मुलायमसिंह हे लोहिया यांच्या विचारांचे वाहक आहेत. त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर आहे. याची चौकशी करण्यात येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘सिंहा’च्या मुद्द्यावरून सपाप्रमुख ‘मुलायम’
By admin | Updated: August 10, 2016 03:52 IST