मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे लिहून वादात अडकलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिला आहे. ७ एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. माझ्या जीवाला धोका असून महाराष्ट्रातील कोर्टासमोर उभा राहू शकत नाही असं कुणाल कामराने त्याच्या याचिकेत म्हटलं होते. त्यातच मुंबईतील खार पोलिसांनी ३१ मार्च रोजी कुणाल कामराला हजर राहण्यासाठी दुसरं समन्स पाठवले आहे.
मद्रास हायकोर्टाने कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कुणाल कामराला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीवरून कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंवर केलेल्या गाण्यामुळे शिवसैनिक संतापले होते. त्यांनी ज्याठिकाणी या शोचं शूटिंग झालं तिथे तोडफोड केली होती.
कुणाल कामरा याने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यात २०२१ पासून मी तामिळनाडूत राहत आहे. मुंबई पोलीस माझ्यावर अटकेची कारवाई करू शकते त्यासाठी अंतरिम जामीन द्यावा असं याचिकेत म्हटलं. त्यावर कोर्टाने ७ एप्रिलपर्यंत कामराला अटकेपासून संरक्षण दिले आहे.
काय आहे वाद?
कॉमेडियन कुणाल कामराने खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलच्या द हॅबिटॅट क्लबमध्ये एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. कामराचं गाणं व्हायरल होताच शिंदेसेनेच्या शिवसैनिकांनी द हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली होती. याप्रकरणी कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 'दिल तो पागल है' चित्रपटातील 'भोली सी सूरत आँखों में मस्ती' या गाण्याच्या चालीवर कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या विंडबनात्मक गाणे लिहिले होते. त्यानंतर हा सगळा वाद झाला.
'कुणाल कामरा कोणत्याही बिळात असला, तरी त्याला बाहेर काढून आपटू'; शिंदेंच्या मंत्र्याचा इशारा
शिंदेंच्या मंत्र्यांनी दिली होती धमकी
कुणाल कामरा वादातून शिंदेसेनेचे मंत्रीही भडकल्याचे पाहायला मिळाले. "पोलिसांची थर्ड डिग्री असते, त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामराबाबतीत करावा लागेल. आता आम्ही मंत्री जरी असलो, तरी आम्ही आधी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे शिवसैनिक आहोत असं मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं.