जवळपास दोन महिन्यांपासून मेघालयच्या तुरुंगात बंद असलेली सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांना जामीन मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी ठरला आहे. दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला होता, पण न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेली पत्नी सोनम आणि प्रियकर राज यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यामुळे त्यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे.
लग्नाच्या ११ दिवसांनंतरच हत्येचा कटइंदूरच्या सहकार नगरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशी यांचं लग्न ११ मे रोजी सोनमसोबत झालं होतं. लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांनी सोनमने राजाला हनिमूनच्या बहाण्याने शिलाँगला नेलं. तिथे तिने तिचा कथित प्रियकर राज आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने राजाची हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकून दिला, असा आरोप आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की, या हत्येचा कट सोनमने राजसोबत मिळून रचला होता. या हत्येमधील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मात्र जामीन मिळाला आहे. शिलाँगहून परतल्यानंतर त्यांनी सोनमला इंदूरमध्ये आश्रय दिला होता आणि पुरावे मिटवण्यास मदत केली होती.
पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्नहत्येनंतर सोनम इंदूरला परतली होती आणि देवास नाक्यावरील एका फ्लॅटमध्ये लपून राहिली होती. हा फ्लॅट ब्रोकर शिलोम जेम्सच्या माध्यमातून घेण्यात आला होता. पोलीस तपासानुसार, सोनम फरार झाल्यानंतर ब्रोकर शिलोम, फ्लॅट मालक लोकेन्द्र सिंह तोमर आणि सुरक्षा रक्षक बलवीर यांनी मिळून फ्लॅटमधील बॅग, पिस्तूल आणि दागिने पलासीया येथील एका नाल्यात फेकून दिले होते. आता या तिघांनाही कोर्टातून जामीन मिळाला आहे.
१५ ऑगस्टनंतर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यतासध्या शिलाँग पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केलेलं नाही. १५ ऑगस्टनंतर आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे, त्यानंतर कोर्टात सुनावणी सुरू होईल. राजाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, ही हत्या पूर्वनियोजित आणि अत्यंत चलाखीने केलेली आहे, त्यामुळे आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी.