मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेला असताना बेपत्ता झालेल्या इंदूर येथील राजा रघुवंशी याची हत्या त्याच्याच पत्नीने केल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच राजा रघुवंशी याची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने राजाचा काटा काढण्यासाठी रचलेल्या भयानक कटाचाही आता चौकशीमधून हळुहळू उलगडा होत आहे.
शिलाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम हिने पती राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी अत्यंत धूर्तपणे कट रचला होता. जेव्हा राजा याची हत्या झाली तेव्हा सोनमचा प्रियकर राज कुशवाह हा घटनास्थळी नव्हता. सोनलने त्याच्याकडे राजा याची हत्या करण्यासाठी सुपारी घेणाऱ्यांची व्यवस्था करण्याची आणि त्यांना शिलाँगला पाठवण्याची जबाबदारी सोपवली होती. तसेच कुणाला संशय येऊ नये, तसेच पोलिसांकडून पकडले जाऊ नये यासाठी सोनमने राज याला इंदूर येथेच राहण्यास सांगितले होते.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर राज कुशवाहा हा शिलाँगला गेला असता तर सोनमच्या कुटुंबीयांकडून काही गडबड होऊन हा कट उघडकीस आला असता. त्यामुळे सोमन हिने राज याला इंदूर येथेच ठेवून आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या आरोपींना शिलाँगला पाठवले. सोनम रघुवंशी हिला ट्रान्झिस्ट रिमांवर घेऊन गाझीपूरहून पाटणा येथे नेताना शिलाँग पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, त्यामधून तिची लबाडी आणि सुपिक मेंदूतून शिजलेल्या कटाची माहिती समोर आली.
सोनम आणि राजा यांचा विवाह याच वर्षी एका मॅट्रोमोनियल अॅपच्या माध्यमातून ठरला होता. याच अॅपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांची ओळख झाली होती. तसेच ११ मे रोजी सोनम आणि राजा यांचा मृत्यू झाला होता. तसेच लग्नाला नऊ दिवस झाल्यानंतर २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. तसेच २३ मे रोजी नोंग्रियाट गावातील एका होम स्टेमधून बाहेर पडल्यानंतर राजा याची सोनमच्या इशाऱ्यावरून तीन जणांनी हत्या केली होती. तसेच त्याचा मृतदेह वेईसावडाँग झऱ्याजवळच्या दरीत फेकून दिला होता. या प्रकरणाची देशपातळीवर खूप चर्चा झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली. तसेच २ जून रोजी राजा याचा मृतदेह सापडला. तर ९ जून रोजी सोनम रघुवंशी ही सुद्धा पोलिसांना सापडली.