सिंहस्थाचा सूक्ष्म नियोजन आराखडा आज बैठक : पूर्वतयारीवर अंतिम हात
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नाशिक : येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कामांचा आढावा घेणार असल्याने विविध यंत्रणांनी आजवर केलेली कामे व त्या कामांच्या उपलब्धतेबाबत सूक्ष्म आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याची पूर्वतयारी म्हणून बुधवारी बैठक घेण्यात येत आहे.
सिंहस्थाचा सूक्ष्म नियोजन आराखडा आज बैठक : पूर्वतयारीवर अंतिम हात
नाशिक : येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कामांचा आढावा घेणार असल्याने विविध यंत्रणांनी आजवर केलेली कामे व त्या कामांच्या उपलब्धतेबाबत सूक्ष्म आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याची पूर्वतयारी म्हणून बुधवारी बैठक घेण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या सार्वजनिक सुटीमुळे दर मंगळवारी होणारी सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठक बुधवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले, परंतु या बैठकीत प्रत्येक खात्याला त्याने केलेल्या आजवरच्या कामाचा आढावा व त्याचे सूक्ष्म नियोजन तयार करण्यास सांगण्यात आले आहे. बुधवारच्या बैठकीत प्रत्येक विभाग करीत असलेल्या कामाबरोबरच या कामाची उपलब्धता व संबंधित खात्याला होणारा त्याचा उपयोग याचे सादरीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच विभागीय आयुक्तांनी विषयानुरूप नोडल अधिकार्याची नेमणूक केली असल्याने बुधवारच्या बैठकीत प्रत्येक खात्याच्या सूक्ष्म नियोजन आराखड्यानुसार नोडल अधिकार्यांनाही त्याची प्रत दिली जाईल जेणे करून त्यांना समन्वय साधणे सोपे होणार आहे. येत्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सिंहस्थ कामांचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासनासमोर राज्य सरकारच्या पातळीवर वा संबंधित खात्याशी निगडीत असलेले प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्याची जशी शक्यता आहे तसेच कुंभमेळ्याच्या नियोजनावरही अंतिम हात फिरविला जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून ज्या ज्या सोयी, सुविधा तसेच विकासकामे करण्यात आली, त्याचा प्रत्यक्ष भाविक व साधु-महंतांना काय व कसा उपयोग होईल त्याचबरोबर एकमेकांशी निगडीत असलेल्या खात्यांमध्ये कशा प्रकारचा समन्वय असेल याची तयारी बुधवारच्या बैठकीत करण्यात येणार आहे. चौकट===साधु-महंत अनभिज्ञसिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित साधु-महंतांची एकत्रित बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या नियोजनात त्यांना सहभागी करून घेण्याची होणारी मागणी लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार्या बैठकीत साधु-महंतांना सहभागी करण्याबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे. मुख्यमंत्र्यांकडून फक्त बैठकीची वेळ मिळाली, त्या बैठकीत कोण सहभागी असेल हे अद्याप ठरलेले नसल्याचे वरिष्ठ शासकीय अधिकार्यांनी सांगितले. मात्र साधु-महंतांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, अशी जाहीर मागणी केली आहे.