नवी दिल्ली : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी एक्सिओम-४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) हाडांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रयोग केला आहे. सूक्ष्मगुरुत्व परिस्थितीत हाडांचे विघटन कसे होते आणि पृथ्वीवर परतल्यावर ते कसे पुन्हा सुधारतात, याचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून भविष्यात ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांवरील उपचार अधिक परिणामकारक होण्याची शक्यता आहे.
शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर हा प्रयोग केला. त्याचबरोबर त्यांनी अंतराळातील विकिरणाचा प्रभाव मोजण्याचा प्रयोगही केला.
शुक्ला हे १४ दिवसांच्या संयुक्त इस्रो-नासा मोहिमेवर असून, त्यांनी टार्डिग्रेड्स या सूक्ष्मजिवांवरील प्रयोगही यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रयोगामध्ये त्यांच्या अंतराळातील अस्तित्व व प्रजनन क्षमतेचा अभ्यास करण्यात आला. एक्सिओम स्पेसच्या म्हणण्यानुसार, शुभांशु शुक्ला यांनी सूक्ष्म शैवालांचे नमुन्यांवरही प्रयोग सुरू केले आहेत.
हाडांचे ‘डिजिटल ट्विन’!
अंतराळात सूक्ष्मगुरुत्वाच्या स्थितीत माणसाच्या हाडांवर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी शुभांशू यांनी हाडांच्या रचनात्मक बदलांचा अभ्यास करून एक ‘डिजिटल ट्विन’ विकसित करत आहेत.
हा डिजिटल ट्विन म्हणजे हाडांचे आभासी प्रतिरूप असून, तो खऱ्या हाडांप्रमाणेच वागतो. यातून हाडांची झीज, सूज आणि पुनर्निर्माण कसे घडते, यावर आधारित अचूक मापन करता येणार आहे. यामुळे अंतराळातच नव्हे, तर पृथ्वीवरील ऑस्टियोपोरोसिस, इतर हाडांशी संबंधित विकारांवरील उपचार अधिक परिणामकारक होऊ शकतात.