जालंधर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला इतर राज्यांमध्ये सपाटून मार खावा लागलेला असताना पंजाबने साथ दिली. फतेहगड साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे खासदार डॉ. अमर सिंह यांनी धन्यवाद कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात पाकिटमारांनी धुमाकूळ घालत डझनभर काँग्रेस नेत्यांची पाकिटे लंपास केली.
नवनिर्वाचित खासदार डॉ. अमर सिंह यांच्यासोबत सेल्फी घेण्यात येणार होते. या बहान्याने पाकिटमारही कार्यक्रमात घुसले होते. पंजाब पोलिसांनी सांगितल्यानुसार ही घटना अमलोह रोडवरील सुरजीत बैंक्वेट हॉलमधील होती. याठिकाणी विविध ठिकाणांहून लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते आले होते. आमदार रणदीप काका समवेत 10 काँग्रेस नेत्यांची पाकिटे यावेळी चोरण्यात आली. पाकिटमारांनी आमदाराच्या स्वीय सहाय्यकालाही सोडले नाही. आमदार राम कृष्ण भल्ला यांच्या पीएचीही पर्स चोरली.