ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 4 - उत्तर प्रदेशमधल्या अमेठी शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीनं कुटुंबीयांमधील 10 जणांची निर्घृण हत्या करून स्वतःही आत्महत्या केली आहे. या व्यक्तींना दोन महिलांसह 8 लहानग्यांचा निर्दयीपणे खून केला. त्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीअंती आर्थिक चणचण आणि कौटुंबिक कलहाला कंटाळून या विकृत व्यक्तीनं 10 जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना शुकुल बाजारमधल्या महोना गावात घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सर्वांची हत्या करणारा जमालुद्दीनचा मृतदेहही लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. उर्वरित कुटुंबीयांच्या मृतदेहांचा गळा चिरण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जमालुद्दीन हा बॅटरीचं काम करतो. हत्या करण्यात आलेल्यांमधील दोन मुलं ही भावाची आणि बाकीची जमालुद्दीनची असल्याची माहिती मिळते आहे. या कुटुंबीयांना जमालुद्दीनने पहिल्यांदा पिण्यास दिले आणि त्यानंतर त्यांची गळा चिरून हत्या केली. याचदरम्यान जमालुद्दीनची पत्नी आणि मुलगी बेशुद्धीच्या अवस्थेत आढळून आली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात जमालुद्दीनच्या मुलीनं सांगितले की, रात्री वडिलांनी कुटुंबीयांना काही तरी पिण्यास दिलं होतं. त्यानंतर सर्व झोपी गेले. पोलीस अधीक्षक संतोष सिंह या प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच सर्व काही उघड होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
धक्कादायक ! उत्तर प्रदेशात एकानं केली 10 जणांची हत्या
By admin | Updated: January 4, 2017 16:36 IST