गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडूनही बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही. आम्हाला वाटेल, तेव्हा आम्ही मुंबईत परत येऊ. हा सगळा खटाटोप शिवसेना वाचवण्यासाठी आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले.
शिवसेनेच्या १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावर बोलताना, आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जात नाही. १२ आमदारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो पूर्णपणे बेकायदा आहे. पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिला नाही, केवळ या कारणामुळे कोणावरही निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही किंवा त्यांना अयोग्य घोषित करणे चुकीचे आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि घाबरण्याचे कारण नाही
शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले होते. यावर बोलताना, कोणती किंमत चुकवावी लागेल, असा उलटप्रश्न करत, तुम्ही ज्या चुका करून ठेवल्या आहेत, त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही शिवसेनेला बर्बाद करताय, असा आमचा आरोप आहे. यावर, कोणावर आरोप करताय, या प्रश्नावर टीव्ही येऊन जे बोलत असतात, तुम्ही सगळे पाहता. तुम्हीच जाऊन मुलाखती घेत असता, असे ते म्हणाले
संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात
यानंतर थेट संजय राऊत यांचे नाव घेऊन प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात. ते सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील, याचा काही नेम नाही. त्याचा पत्ता कोणालाही लागत नाही आणि काय बोलतात हेही समजत नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला. शिंदे गटाच्या रणनीतिबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होतो, तेव्हा आमची विचारसरणी, धोरण संपवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शिरसाट यांनी केली.