Happy Birthday PM Modi, Sharad Pawar : १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. आज ते ७५ वर्षांचे झाले. मागील ११ वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केलेल्या कामाचा आणि योजनांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. भारताला जगाच्या नकाशावर वेगळी उंची मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी सतत प्रयत्नशील आहेत. या काळात जसे मोदींचे चाहते वाढले तसेच, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्याही प्रचंड वाढली. मोदींना राबवलेल्या योजनांवर विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील सातत्याने मोदींच्या काही योजनांवर टीका करताना दिसतात. पण आज पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
"नरेंद्र मोदी, तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती सतत होत राहो आणि येणाऱ्या काळात देशाचे अधिकाधिक कल्याण आणि विकास होत राहो अशी मी आशा करतो," अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
काँग्रेसचे खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या आणि उत्तम आरोग्याच्या खूप शुभेच्छा.
अमित शाह म्हणाले...
"मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक आकांक्षांचे केंद्र बनले आहे. अंतराळातील चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ते द्वारकेतील समुद्राच्या खोलीपर्यंत, त्यांनी वारसा आणि विज्ञानाला वैभव मिळवून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारत आज अंतराळ क्षेत्रात नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. स्वदेशी कोविड लसी, स्वदेशी संरक्षण प्रणाली, स्टार्टअप्स, नवोन्मेष, शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यापासून ते उत्पादन मोहिमेपर्यंत, मोदी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी भारताची निर्मिती करत आहेत," अशा शुभेच्छा अमित शाह यांनी दिल्या.