विजापूर : सिंदगी तालुक्यातील आलमेल गावातील मागासवर्गीय कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेतील 40 विद्यार्थिनीवर चार वर्षापासून लैंगिक अत्याचार होत असल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी नराधमाला अटक करण्यात आली आहे.
विजयकुमार एंटमाने असे आरोपीचे नाव असून 2क्1क्पासून हा प्रकार सुरू होता. मात्र विजयकुमार गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या दहशतीने शाळेचे मुख्याध्यापक, हॉस्टेल वॉर्डन, कर्मचारी यापैकी कुणीही याची बाहेर वाच्यता केली नाही. आरोपी विद्यार्थिनीला धमकावून अत्याचार करीत असे, यातून अनेकजणी गर्भवती राहिल्या. शिवाय तो विद्यार्थिनींना गर्भनिरोधक गोळ्या देऊन शारीरिक छळ करीत असे.
अखेर या विद्यार्थिनींनी ‘सहाय्यवाणी’ या महिला संघटनेला पत्र पाठवून आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली. विद्यार्थिनींनी साहाय्यवाणीला सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे. साहाय्यवाणीच्या संयोजिका सुनंदा यांनी पोलिसांकडे याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
या घटनेमुळे विजापूर जिल्हा प्रशासन हादरले असून जिल्हाधिकारी रणदीप यांनी रात्री आलमेल येथे भेट देऊन माहिती घेतली. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील मुली या कित्तूर राणी चन्नम्मा वसतिशाळेच्या वसतिगृहात आहेत. (प्रतिनिधी)
वॉर्डनला दमदाटी
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनी विजयकुमारच्या छळाला बळी पडल्या आहेत. रात्र होताच शालेय कर्मचारी निघून जात. त्यानंतर हॉस्टेल वॉर्डन शोभा हिच्यावर सर्व विद्यार्थिनींची जबाबदारी होती. तिला याची माहिती होती, मात्र विजयकुमारच्या धमकीमुळे तिने मौन बाळगले होते.
कित्तूर राणी चन्नम्मा वस्तीशाळेच्या वसतीगृहातील प्रकार नींदनीय आहे. या प्रकाराची चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल.
-एम.बी. पाटील, संपर्कमंत्री, विजापूर