पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांच्या शोधात जम्मू-काश्मीरमध्ये जंग जंग पछा़डत आहेत. प्रत्येक घरात, गल्लीत जाऊन झडती घेतली जात आहे. असे असताना दहशतवाद्यांनी कुपवाडामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
कांडी खास येथील गुलाम रसूल मगरे (वय ४५) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. कुपवाडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर मगरे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. अतिरेक्यांनी सामाजिक कार्यकर्त्याला का लक्ष्य केले हे स्पष्ट झालेले नाही.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण खोऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच ही गोळीबाराची घटना घडली आहे.
दरम्यान, हलगाम हल्ल्यानंतर आतापर्यंत सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनीतील जमील अहमद आणि जैनापोरा येथील अदनान शफी यांच्याव्यतिरिक्त सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांची घरं पाडली त्यात फारुख, अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे, त्रालमधील खासीपोरा येथील अमीर नजीर आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी यांचा समावेश आहे. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं, ते स्फोट घडवून उडवण्यात आलं आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.