ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ - गेल्या २५ वर्षांपासून अभेद्य असलेल्या भाजपा- शिवसेना युतीच्या तुटीबाबत एकही शब्द न उच्चारणा-या सरसंघचालक मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला. नागपूर येथे विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना त्यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित केले. युतीच्या तुटण्याबाबत भागवतांनी चकार शब्दही काढला नाही. मोदींच्या सरकारला केवळ सहा महिने पूर्ण झाले आहेत, देशात नवचैतन्य संचारले आहे, त्यांनी केलेल्या कामगिरीवरून चांगले संकेत मिळत आहेत, असे ते म्हणाले. मात्र असे असले तरी सरकारच्या हातात जादूची कांडी नाही. विकास कामांसाठी केंद्र सरकारला वेळ द्यायला हवा असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर टीका करणा-यांना सडेतोड उत्तर दिले,
यावेळी त्यांनी देशातील धर्म व संस्कृतीने तोडण्याचे नव्हे तर सर्वांना नेहमी जोडून ठेवल्याचे प्रतिपादन केले. भारताने कधीही कोणत्याही देशाच्या संस्कृतीवर हल्ला केला नाही अथवा कोणत्याही समुदायाला त्यांचा धर्म वा विचारधारा बदलण्याची सक्ती केली नाही. सर्वांचा स्वीकार करणे व सर्वांना एकत्र घेऊन चालणे हीच आपली संस्कृती आहे, असे ते म्हणाले. भारत हा प्राचीन असून तो इतरांचा मोठा भाऊ आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्वांना एकत्र घेऊन चाललो तरच देशाचा विकास शक्य आहे. वैयक्तिक स्वार्थामुळे आपले फक्त पतन होते. पश्चिमी राष्ट्रांत जे वातावरण आहे त्याला त्यांचा अहंकार, कट्टरवादी विचारधाराच कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी मंगळ मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे अभिनदंनही केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना स्वदेशी वापरण्याचा सल्ला दिला. आपण सरकारकडून अपेक्षा करतो की, देशाने चीनच्या घुसखोरीवर चोख उत्तर द्यायला हवं, मात्र आपण त्याच चीनी वस्तू वापरतो. चीनी वस्तू वापरण बंद केलं तरच आपली अर्थव्यवस्था सुधारेल असे त्यांनी सांगितले.
दरम्यान सरसंघचालकांचे भाषण दूरदर्शनवरून पहिल्यांदाच प्रसारित करण्यात आले असून त्याला काही लोकांनी आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एखाद्या धार्मिक संघटनेसाठी केलेला हा सरकारी माध्यमांचा गैरवापर असल्याचे सांगत इतर धर्मीय नागरिकही त्यांचे कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्याची मागणी करतील. याविरोधात आवाज उठवायला हवा असे मत गुहा यांनी व्यक्त केले. . सरकारी यंत्रणेचा मोदी सरकार दुरूपयोग करत असल्याची टीका करत सीपीएमनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.