नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त शनिवारी देशभर भारतीय वीर जवानांनी या युद्धात दाखवलेल्या शौर्याला सलामी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तर कारगिलमध्ये सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना राखी बांधली.
कारगिल क्षेत्रातून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी तीन महिने चाललेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये प्राणांची बाजी लावून भारतीय जवानांनी लडाखच्या कारगिल भागात असलेल्या हिमाच्छादित शिखरांवर पुन्हा ताबा मिळवला होता. तो दिवस होता २६ जुलै १९९९.
कठीण परिस्थितीत विजय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना या जवानांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शत्रूवर मिळवलेला विजय कायम प्रेरणादायी ठरेल, असे नमूद केले.
सदैव प्रेरणा मिळेल : राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या युद्धात बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली. हे बलिदान देशातील नागरिकांना सतत प्रेरणा देत राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
मालदीव दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा देताना, ही मातृभूमी वीर जवानांच्या अद्वितीय शौर्याचे कायम स्मरण करेल, असे म्हटले आहे. या जवानांनी भारतीय स्वाभिमानाच्या रक्षणासाठी जीवन समर्पित केल्याचे त्यांनी नमूद केले.