नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल ही गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या नव्या आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. चीनची ली शुरुई तिसऱ्या स्थानावर घसरल्यामुळे सायनाला दुसऱ्यांदा नंबर वन होण्याची संधी मिळाली.या महिन्याच्या सुरुवातीला इंडियन ओपन टेनिस जिंकल्यामुळे सायना विश्व क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारी भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू बनली. काही दिवसांनंतर मात्र मलेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्याने सायना दुसऱ्या स्थानावर घसरली होती. सायना गेल्या महिन्यात झालेल्या सिंगापूर ओपन सुपर सिरीजमध्ये खेळली नव्हती. त्याच वेळी चीनच्या प्रतिस्पिर्धी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेताच तिला दोन स्थानांचा फटका बसला. सानियाला याचा लाभ झाल्याने ती अव्वल स्थानावर झेपावली आहे. स्पेनची मारीन कॅरोलिना सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.दरम्यान, पी. व्ही. सिंधू अव्वल १० खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडली. आधी ती नवव्या स्थानावर होती. आता १२व्या स्थानावर घसरली. पुरुष क्रमवारीत के. श्रीकांतने चौथे स्थान कायम राखले आहे. पी. कश्यपने सिंगापूर ओपनची उपांत्य फेरी गाठल्याने तो १५ वरून १४व्या स्थानावर पोहोचला. एच. एस. प्रणय १५व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)
सायना पुन्हा अव्वल स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 01:44 IST