ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ५ - भारतात राहून पाकिस्तानचे कौतुक करणा-यांना चपलेने झोडून त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवा असे प्रक्षोभक विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी बालिका सरस्वती यांनी केले आहे. हिंदूंनी अयोध्येप्रमाणेच पाकमधील इस्लामाबादमध्येही राम मंदिर बांधायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेशमध्ये नुकतेच हिंदू समाजोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील प्रमुख वक्त्या साध्वी बालिका सरस्वती यांनी प्रक्षोभक भाषण केले. लव्ह जिहादवरुन टीका करताना साध्वी म्हणतात, आता शांत बसण्याची वेळ नाही. डोळ्याच्या बदल्यात डोळा घेण्याची वेळ आली आहे. शांततेच्या मार्गाने लढा दिल्यास स्वातंत्र्य मिळते असे म्हटले जायचे. पण आता हातात शस्त्र घेतल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही असे साध्वी यांनी म्हटले आहे. भारतात खाणारी व राहणारी जी लोकं पाकचे कौतुक करतील त्यांना चोपून पाकिस्तानमध्ये पाठवून द्या असे विधानही त्यांनी केले.
मध्यप्रदेश पोलिसांनी साध्वी बालिका सरस्वती यांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. साध्वींच्या भाषणाची सीडी तपासत असून यात आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करु अशी माहिती पोलिस आयुक्त एस. मुरुगन यांनी दिली.