ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम प्रस्थापित करणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साहित्यविश्वातदेखील विक्रमी पदार्पण केले आहे. सचिनच्या प्लेइंग इट माय वे या आत्मचरीत्राने पुस्तक प्रकाशित झाले त्यादिवशीच दीड लाख कॉपीजची ऑर्डर नोंदवली असून सत्यकथा व काल्पनिक कथा या दोन्ही प्रकारच्या पुस्तकांच्या यापूर्वीच्या खपाचे उच्चांक मोडले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशकांनी हॅचेट इंडियानेच ही माहिती दिली आहे.
याआधी स्टीव्ह जॉबच्या चरीत्राने प्रकाशनाच्या दिवशी १,३०,००० कॉपीजची ऑर्डर घेत विक्रम केला होता, हा विक्रम सचिनच्या पुस्तकाने मागे टाकला आहे. विक्रीपूर्व मागणीच्या बाबतीत दीड लाखांचा टप्पा पार जाल्याचे हॅचेटने म्हटले असून यात आश्चर्यकारक काहीच नसल्याचेही म्हटले आहे. ही तर कुठे सुरुवात आहे, अशी टिप्पणीही हॅचेटचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस अब्राहम यांनी केली आहे.