नवी दिल्ली : अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची बुधवारी रात्री सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुजाता सिंग यांचा कार्यकाळ संपायला आठ महिन्यांचा अवधी बाकी होता. परंतु त्यांच्या कार्यकाळात अचानक कपात करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेटच्या नियुक्ती समितीच्या बैठकीत जयशंकर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सुजाता सिंग यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या आॅगस्टमध्ये संपणार होता. ‘परराष्ट्र सेवेत असलेल्या १९७६ च्या आयएफएस तुकडीतील सुजाता सिंग यांच्या कार्यकाळात तत्काळ प्रभावाने कपात करण्यात येत आहे आणि त्यांच्या जागी विदेश सचिव म्हणून १९७७ च्या आयएफएस तुकडीतील एस. जयशंकर यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येत आहे’, असे एका सरकारी पत्रकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
एस. जयशंकर नवे विदेश सचिव
By admin | Updated: January 29, 2015 08:50 IST