कर्नाटकच्या दक्षिण किनाऱ्यावरील रामतीर्थ टेकडीवर पोलीस पथकाने गस्त घालताना एक धक्कादायक दृश्य पाहिलं. एक परदेशी महिला तिच्या दोन मुलींसह जंगलातील एका गुहेत राहत होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता नीना कुटीना असं या महिलेचं नाव असल्याचं समोर आलं. जंगलातून बाहेर पडल्यानंतर या रशियन महिलेने सर्वात आधी तिचा फोन चार्ज केला आणि कोणालातरी ईमेल पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीना कुटीनासोबत तिच्या दोन मुलीही होत्या, एक ६ वर्षांची आणि दुसरी फक्त ४ वर्षांची. धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचा व्हिसाची मुदत ८ वर्षांपूर्वीच संपली होती. नीना गुहेत आश्रमासारखी राहायची. ती दिव्यांच्या प्रकाशात योगा करायची. मातीच्या चुलीवर भाकरी बनवायची आणि हिंदू देवतांच्या चित्रांनी भिंती सजवून ध्यानधारणा करायची. तिच्यासाठी गुहा 'स्वर्ग' होती.
"गुहेतील आमचं शांततापूर्ण जीवन संपलं"
जंगलातून बाहेर पडताच तिने संधी मिळताच आधी आपला फोन चार्ज केला. त्यानंतर सर्वांत पहिला रशियातील तिच्या नातेवाईकांना ई-मेल पाठवला. "गुहेतील आमचं शांततापूर्ण जीवन संपलं आहे... आमचे गुहेतील घर उद्ध्वस्त झालं. वर्षानुवर्षे आम्ही मोकळ्या आकाशाखाली निसर्गासोबत राहत होतो, कोणत्याही सापाने किंवा प्राण्याने आम्हाला कधीही इजा केलेली नाही" असं नीनाने तिच्या ई-मेलमध्ये लिहिलं होतं.
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
नीनाने दिलेल्या माहितीनुसार, ती यापूर्वी चार देशांमध्ये राहिली आहे आणि २०१७ मध्ये भारतात आली आहे. सुरुवातीला ती गोव्यात राहत होती, नंतर नेपाळला गेली आणि तिथून पुन्हा भारतात परतली, परंतु यावेळी तिने शहरात न राहता जंगलात राहण्याचा पर्याय निवडला. ती तिच्या दोन मुलींसोबत जंगलात अत्यंत आनंदी जीवन जगत होती.