नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लीम धर्मगुरू आणि अभ्यासकांची भेट घेतली. दिल्लीत हरियाणा भवन येथे ही बैठक पार पडली ज्यात संघाचे अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. जवळपास साडे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत दोन्ही बाजूने राष्ट्रीय स्तरावरील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय या बैठकीत हिंदू आणि मुस्लीम समुदायातील प्रतिनिधींमध्ये संवादाचे माध्यम सुरू ठेवत गैरसमज दूर करण्याबाबत एकमत झाले.
या बैठकीनंतर ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं की, सध्या गुरुकूल आणि मदरसा यांच्यात चर्चेची वेळ आहे. आमची बैठक साडे तीस सुरू होती. त्यात ६० प्रमुख इमाम आणि मुफ्ती यांच्यासोबत देवबंद, नदवासारख्या प्रमुख इस्लाम मदरशाचे प्रतिनिधी सहभागी होते. मोहन भागवत यांनी समाजात निर्माण होणारा गैरसमज आणि दिशाभूल दूर करण्यासाठी संवाद सुरू केला त्याचे कौतुक इलियासी यांनी केले. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. चांगल्या वातावरणात ही बैठक पार पडली असं त्यांनी म्हटलं.
तर संघाने जी बैठक घेतली ती सकारात्मक झाली. या संवादाचा उद्देश देशातील सर्व समाजाला मिळून देशहितासाठी काम करणे हा आहे. सर्व जाती, धर्माचे लोक राष्ट्र सर्वोपरी या भावनेतून एकत्र यायला हवेत. राष्ट्राच्या निर्माणात सर्वांचे योगदान असायला हवे असं संघाचे माध्यम विभागाचे प्रमुक सुनील आंबेकर यांनी म्हटलं. या बैठकीला आरएसएसकडून मोहन भागवत यांच्यासोबत कृष्ण गोपाळ, इंद्रेश कुमारसह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. समाजातील सर्व वर्गासोबत व्यापक संवाद यापुढच्या काळातही सतत सुरू राहील असं संघाने सांगितले.
या बैठकीत काय ठरलं?
मोहन भागवत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मुद्द्यांवर उघडपणे चर्चा करण्यात आली. त्यात मंदिर, मशिद, इमाम, पुजारी, गुरुकूल आणि मदरसा यांच्यात संवाद असायला हवा असा निर्णय घेण्यात आला. आमची संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिळून हा संवाद पुढे सुरूच ठेवू असं उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं. प्रत्येक मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संवाद हे एकमेव माध्यम आहे. संवादातून गैरसमज दूर होतात. द्वेष संपतो. एकमेकांसोबत समन्वय निर्माण होतो. विश्वास वाढतो असं इलियासी यांनी बैठकीनंतर सांगितले. या बैठकीत अनेक प्रतिनिधींनी वक्फ, समान नागरी कायदा आणि मुसलमानांशी निगडीत अनेक मुद्दे उपस्थित केले अशी माहिती सूत्रांनी दिली.