भागवतांना RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती- संघ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 09:19 AM2018-02-12T09:19:01+5:302018-02-12T09:34:53+5:30
मोहन भागवत यांना केवळ RSS किती शिस्तबद्ध संघटना आहे, हे अधोरेखित करायचे होते.
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अवघ्या तीन दिवसांमध्ये सैन्याची उभारणी करू शकतो, हे वक्तव्य करताना सरसंघचालक मोहन भागवत यांना कोणत्याही प्रकारे RSS आणि भारतीय सैन्याची तुलना करायची नव्हती, असे स्पष्टीकरण संघाकडून देण्यात आले आहे.
मोहन भागवत यांना केवळ RSS किती शिस्तबद्ध संघटना आहे, हे अधोरेखित करायचे होते. त्यांचा विधानाचा अर्थ असा होता की, सैन्याने सामान्य लष्करातून जवानांची निवड केल्यास त्यांना प्रशिक्षण करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल. याउलट RSS चे स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसांत प्रशिक्षित होऊ शकतात, असे RSS चे अखिल भारतीय प्रचारक मनमोहन वैद्य यांनी सांगितले.
मोहन भागवत यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आमची सैन्य तयार करण्याची क्षमता आहे. पण ही आमची लष्करी संघटना नाही. तर ही कौटुंबीक संघटना आहे. पण संघात लष्करासारखीच शिस्त आहे. देशाला गरज असेल आणि संविधानाने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसतहसत बलिदान द्यायला तयार आहेत, असे भागवत यांनी सांगितले.
देशातील आपत्तीच्यावेळी संघ स्वयंसेवक नेहमीच तत्पर असतात. भारत-चीन युद्धाच्यावेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वंयसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणलं तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणं कठीण होईल, असा दावाही भागवतांनी केला होता.
मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याबद्दल संघाने भारतीय लष्कराची माफी मागितली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.