मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नितीन सरदेसाई यांनी आपला निवडणूक अर्ज अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या पत्नी जानकी सरदेसाई यांना ६२ लाखांचे वैयक्तिक कर्ज दिल्याचे नमूद केले आहे. सरदेसाई यांनी पत्नीला वैयक्तिक कर्ज दिले असतानाच, पत्नीकडे ४ कोटी ६५ लाख ७१ हजार रुपयांची मालमत्ता असल्याचेही आमदारांनी शपथपत्रात नमूद केले आहे.विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली. उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दिले असून, त्यात आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती सादर केली आहे. मनसे आमदार नितीन सरदेसाई यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात पत्नीकडे २ कोटी ५0 लाख ७१ हजार ५४४ रुपयांची जंगम मालमत्ता आणि २ कोटी १५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. पत्नीकडे कोट्यवधींची मालमत्ता असतानाही सरदेसाई यांनी पत्नीला हे ६२ लाखांचे वैयक्तिक कर्ज दिले आहे.सरदेसाई हे मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संचालक असून, त्यांच्या पत्नी जानकी सरदेसाई या यशराज डेव्हलपर्समध्ये भागीदार आहेत. सरदेसाई यांच्याकडे ४ कोटी ८४ लाख ५३ हजार ३४0 मालमत्ता आहे. त्यांच्याकडे होंडा अॅकॉर्ड ही २0 लाखांची कार आहे. तसेच त्यांच्या पत्नीकडे ह्युंडाई अक्सेंट ही ५ लाख रुपयांची कार असल्याचे सरदेसाई यांनी शपथपत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सरदेसार्इंनी पत्नीला दिले ६२ लाखांचे कर्ज
By admin | Updated: September 29, 2014 04:03 IST