मेरठ : तप्त उन्हात भरदुपारी असहाय महिलेस क्षुल्लक वादावरून भररस्त्यावर मारहाण करून ‘मुर्गा’ बनवून ओढत पोलीस ठाण्यात नेण्याचे कृत्य येथील पोलिसांनी केल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी कंकरखेडा पोलीस ठाण्यात तैनात एसएसआयसह तीन पोलिसांना शनिवारी निलंबित करण्यात आले असून, घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जस्सू परिसरात राहणारी ममता शुक्रवारी दुपारी कंकरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेली होती. तेथे तिचा बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. बँक कॅशिअरने दिलेल्या रकमेपेक्षा १०० रुपये कमी असल्याचे सांगितले, असे तिचे म्हणणे होते. याच कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्याने बँक कर्मचाऱ्याने पोलिसांना दूरध्वनी केला. महिला पोलिसाने तिची बाजू ऐकून न घेता तिला फरफटत बँकेबाहेर काढले. रस्त्यावर बेदम मारहाण केली आणि भरउन्हात बराच काळ ‘मुर्गा’ बनवून उभे ठेवले, अशी या महिलेची तक्रार होती. (वृत्तसंस्था)
महिलेला भररस्त्यात बनविले ‘मुर्गा’
By admin | Updated: June 7, 2015 01:30 IST