Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील एअर इंडिया विमानाच्या अपघातामागील इंधन नियंत्रण स्विचमधील बदल हे संभाव्य कारण मानले जात आहे. दुसरीकडे, अहमदाबाद विमान अपघाताच्या सुरुवातीच्या अहवालाच्या आधारे कोणतेही मत बनवू नये असे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र प्राथमिक तपास अहवालाने एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधले आहे, जी २०१८ मध्येच यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने बोईंग ७३७ जेटसाठी मांडली होती. या अहवालानंतर फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमची जोरदार चर्चा सुरु झालीय.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शनिवारी गेल्या महिन्यात झालेल्या प्राणघातक एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग सिस्टमचा उल्लेख करण्यात आलाय. सुएअर इंडियाच्या बोईंग ७८७ विमानाच्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा उड्डाणानंतर अवघ्या तीन सेकंदात थांबला. विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच काही सेकंदांच्या कालावधीत रनवरून कटऑफवर गेले होते. त्यामुळे फ्युएल कटऑफ स्विच बंद असल्याने इंधन इंजिनपर्यंत पोहोचू शकले नाही आणि वैमानिकांना टेकऑफ करता आलं नाही.
अशातच सात वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०१८ मध्ये, अमेरिकन विमान वाहतूक नियामकाने एक विशेष एअरवर्थिनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन काढले , ज्यामध्ये काही बोईंग ७३७ विमानांमध्ये फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग फिचर नव्हते, असं म्हटलं होतं. ही फक्त एक सूचना असल्याने त्यावेळी ती असुरक्षित मानली गेली नव्हती.
फ्युएल कंट्रोल स्विच काय काम करतात?
हे स्विच विमानाच्या इंजिनमध्ये इंधनाचा प्रवाह नियंत्रित करतात. पायलट जमिनीवर इंजिन सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी त्यांचा वापर करतात. हवेत इंजिन बिघाड झाल्यास इंजिन बंद करण्यासाठी किंवा पुन्हा सुरू करण्यासाठी देखील त्यांचा वापर केला जातो. अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघातामध्ये अहवालानुसार विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच उड्डाणानंतर तीन सेकंदात रन वरून कटऑफ झाले. मात्र हे चुकून घडले की जाणूनबुजून घडले हे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, प्राथमिक अहवालात कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला, “तू इंधन पुरवठा बंद का केलास?” असं विचारलं होतं. यावर दुसऱ्या वैमानिकाने, ‘मी काहीही केलेले नाही’ असं म्हटलं होतं.