काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. जमीन व्यवहार प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ईडीने रॉबर्ट वड्रा यांना समन्स पाठवले आहे. यापूर्वीही त्यांना ८ एप्रिल रोजी बोलावण्यात आले होते पण वाड्रा आले नाहीत. ईडीने जारी केलेल्या नवीन समन्समध्ये आज १५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ईडी आज रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करणार आहे. हे प्रकरण २०१८ चे आहे. हे गुरुग्राममधील स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ यांच्यातील ३.५ एकर जमिनीच्या हस्तांतरणाशी संबंधित प्रकरण आहे. फसवणूक आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप आहेत.
ऑक्टोबर २०११ मध्ये, अरविंद केजरीवाल यांनी रॉबर्ट वड्रा यांच्यावर राजकीय लाभाच्या बदल्यात डीएलएफ लिमिटेडकडून ६५ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज आणि मोठ्या प्रमाणात जमीन घेतल्याचा आरोप केला.
समन्स मिळाल्यानंतर रॉबर्ट वाड्रा त्यांच्या घरातून ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. त्यांनी या समन्सवरुन आरोप केले आहेत. हा 'राजकीय सूड' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'जेव्हा जेव्हा मी लोकांसाठी आवाज उठवतो आणि त्यांचे ऐकतो तेव्हा ते मला दाबण्याचा प्रयत्न करतात. मी नेहमीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि देत राहीन, असंही वाड्रा म्हणाले.
राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली
काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाड्रा यांनी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. येत्या काळात यासाठी पूर्ण ताकदीने काम केले जाईल, असे त्यांनी म्हटले होते. जर जनतेची इच्छा असेल तर मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन. यावेळी त्यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली.